प्रत्येकाने करावा वंचितांच्या सेवेचा संकल्प पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन.

आमचा जिल्हा

रोटरी क्लब, रतन न्यूजपेपर एजन्सीतर्फे सायकल वितरण

चंद्रपूर,दि.२६ – वंचितांची सेवा करणे हे ईश्वरीय कार्य आहे आणि तीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे सेवेतून वंचितांचे दुःख दूर करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा, असे आवाहन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रोटरी क्लब अॉफ चंद्रपूर आणि रतन न्यूजपेपर एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि रतन न्यूजपेपर एजन्सीच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात वृतपत्र वितरकांना ६५ सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप यादव, डॉ. विजय आईंचवार, रतन न्यूजपेपर एजन्सीचे जितेंद्र चोरडिया, एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा, रोटरी क्लबचे सचिव कुंजबिहारी परमार, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. अशोक वासलवार, अरुण तिखे, रविंद्र जुनारकर, नवीन चोरडिया, सार्वजनिक संस्थांचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना आयोजकांचे अभिनंदनही केले. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘रोटरी क्लब आणि रतन न्यूजपेपर एजन्सीच्या वतीने एक उत्तम सामाजिक कार्य होत आहे. त्यामुळे ज्यांना आज सायकल मिळाली आहे त्यांचेही विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना आयुष्यभर भरभरून आनंद मिळावा, अशी माता महाकालीकडे प्रार्थना करतो.

चंद्रपूरमध्ये हिऱ्यांची कमतरता नाही. रोटरी क्लबने १०० सायकल देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी रतन न्यूजपेपर एजन्सीने त्यात शंभर सायकलची भर घातली, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. स्वतः कमावून स्वतःसाठी खर्च करणे ही प्रकृती, स्वतः न कमावता दुसऱ्याच्या कमाईवर नजर ठेवणे ही विकृती आणि स्वतः कमावून त्यातला काही भाग वंचितांसाठी खर्च करणे ही संस्कृती आहे, असे म्हटले जाते. ही संस्कृती चोरडिया परिवाराने दाखविली. हा समाजापुढे एक मोठा आदर्श आहे.’ या समाजात ज्याला वंचितांची सेवा करण्याची संधी मिळेल त्याने या संधीचा लाभ घ्यायला हवा. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’ या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ओळींची प्रचिती देण्याचे काम रोटरी क्लब आणि रतन न्यूजपेपर एजन्सीने केले आहे. समाजाला यथाशक्ती देण्याचे सत्कार्य त्यांच्या हातून झाले आहे, या शब्दांत ना. श्री. मुनगंटीवार यांनी आयोजक संस्थांचा गौरव केला.

४० वर्षापासून पेपर वितरणाचे काम करीत असलेले मारोती धाबेकर, वसंता चरलावार, भूषण शिरसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. तर राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या श्राव्य घोडमारे, सेजल भगतकर, लक्ष घोडमारे व अनन्या देवईकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व रतन न्यूज पेपर एजन्सी तर्फे ना.सुधीर मुनगंटीवार यांना तिरुपती बालाजीची मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सिमला गाजरलावार यांनी केले तर आभार कुंजबिहारी परमार यांनी मानले.