भारताच्या पायाभूत विकासाचा प्रणेता नितिन गडकरी!

राजकीय

‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले..’ संत तुकाराम महाराजांच्या या ओविंप्रमाणे जीवन जगणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे विकासपुरूष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. व्रतस्थ, लोककल्याणकारी, स्वच्छ चारित्र्य, १००% समाजकारण, नि:पक्ष, सतत विकासाचा ध्यास म्हणजे नितीन गडकरी!

सुधीर मुनगंटीवार
मंत्री, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्रात बांधकाम मंत्री ते यशस्वी आणि प्रभावी केंद्रीय मंत्री असा यशस्वी प्रवास ज्यांनी केला. १९८०च्या दशकात जेव्हा जनता पक्षाचे विभाजन झाले व हिंदुत्वाची विचारधारा असलेल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या लोकांनी भाजपची स्थापना केली. त्यावेळी पक्षाला जनमानसात ओळख निर्माण करून देण्यासाठी जे अहोरात्र झटले, त्यापैकी एक नाव म्हणजे नितीन गडकरी.

विश्र्वगौरव पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या कणखर नेतृत्त्वात आंतरराष्ट्रीय पटलावर भारत सन्मानाने उभा आहे. त्यांच्या कर्तबगार मंत्रिमंडळात विकासाचा अजेंडा प्रभावीपणे राबविणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे नितिन गडकरी. महाराष्ट्राच्या राजकारणात उमेदीच्या काळातच गडकरींनी राज्याच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा आजही त्यांच्या विकासात्मक दूरदृष्टीची साक्ष देत आहेत. राज्य सरकारची तिजोरी रिती असतानाही स्वतःचा कल्पकतेतून उड्डाणपूल, सिमेंट रस्त्यांची मालिकाच त्यांनी तयार केली. ३६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना अवघ्या १६०० कोटींमध्ये तयार झालेला आजचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी- बांद्रा सागरी सेतू ही नितीनजींकडून राज्याला मिळालेली भेट आहे हे मान्य करावेच लागेल. राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या नितीनजींना भाजपने केंद्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. मिळालेल्या प्रत्येक पदाची गरिमा वाढविणे ही नितीनजीची खासियत आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या मनामनात पक्षनिष्ठचे, नव ऊर्जेचे, चैतन्याचे ‘कमळ’ फुलविले. भाजपचे ‘व्हिजन २०२५’ हे त्यांचेच. राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी पक्षबांधणीच्या रचलेल्या पायामुळे २०१४ मध्ये भारतीय राजकारणात न भुतो, न भविष्यती असे परिवर्तन झाले. भाजपचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर नितीनजीनी भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी या विभागात विकासाला बराच वाव असल्याचे कृतीतून सिद्ध करुन दाखविले. स्वभावानुसार त्यांनी ही संधी समजून त्याचे सोने केले असे म्हणण्यापेक्षा देशाला सोन्यासारखे रस्ते दिले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर गडकरींनी देशातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यास सुरुवात केली. सद्य:स्थितीत दररोज सरासरी ३८ किलोमीटर रस्ते निर्माण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात पायाभूत सुविधांवर प्रचंड मेहनत घेण्यात आली ती केवळ नितीन गडकरी यांच्या द्रष्ट्या नेत्यामुळेच. त्यांच्या नेतृत्वात प्रथमच जलमार्ग विकासावर भर देण्यात आला. २० हजार किलोमीटरवरील जलमार्ग विकासाच्या प्रवाहात आलेत. देशवासियांना दर्जेदार सुविधा मिळाव्या म्हणून त्यांनी कंत्राटदारांना नेहमीच शिस्तीत ठेवले. निकृष्ट काम कराल तर प्रसंगी जाहिरपणे फटकारेल असा सज्जड दम आजही ते अनेकांना देतात. केवळ रस्ते बांधणीकरून ते मोकळे झाले नाहीत, तर त्या रस्त्यांवरून आवागमन करणाऱ्या प्रवाशांच्या प्राण रक्षणासाठीही त्यांनी व्यापक पुढाकार घेतला. केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील अनावश्यक व कालबाह्य तरतुदी कचरापेटीत फेकून देत नवा कायदा ही नितीनजींचीच देण. नितीनजींप्रती सर्वच पक्षाच्या नेत्यांमध्ये सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच मनात आदरयुक्त भीती आहे अन् तितकीच आपुलकीही. याच प्रेम व आपुलकीमुळे केंद्र सरकार व विदर्भातील जनता यांच्यातील ते अढळ संवादसेतू ठरले आहेत.

सगळेकाही असूनही विदर्भावरील संकटांची मालिका काही संपता संपेना अशी स्थिती होती. नितीनजींनी विदर्भातील शेतकऱ्यांना नवी दिशा दाखविली. बहुतांश कोरडवाहू प्रदेशात असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना आडसाली ऊस व तत्सम पर्यायी कृषी उत्पादनांकडे वळविले. साखर उद्योग, इथेनॉल निर्मिती, पर्यावरणपूरक इंधन निर्मितीचे ते उर्ध्वयू ठरले. आधुनिक कृषी तंत्रज्ञान विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, यासाठी अनेक चर्चासत्र, कार्यशाळा, कृषी प्रदर्शनी, रेडिओ चॅनल, यू-ट्युब चॅनल, पोर्टल आदींच्या यशस्वी आयोजनामागील खरे सूत्रधार नितीनजीच. कृषी रेल्वेच्या संकल्पनेचे मूळ जनकही नितीनजीच.

कोविड महासाथीच्या काळात अख्ख जग थांबले होते, मात्र नितीनजींचा विभाग वेगळ्याच देशकार्यात व्यस्त होता आणि नितीनजी स्वत:ही. कोविड काळात देशात सर्वाधिक रस्ते निर्माणाचा जागतिक रेकॉर्ड स्थापित झाला तो नितीनजींमुळेच. बडोदरास जवळ अडीच किलोमीटरचा फोरलेन काँक्रिट रोड तयार करण्याचा रेकॉर्ड, बिलापूर ते सोलापूर मार्ग २२ तासात पूर्णत्वास नेण्याचा भीमपराक्रमही त्यांच्याच कार्यकाळातील. कोविडच्या लाटांमागुन लाटा आल्या, त्यावेळी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून केवळ नागपूरसाठीच नव्हे तर अख्ख्या विदर्भासाठी ढाल म्हणून नितीनजी उभे राहिले. विदर्भात वर्धेत रेमडिसिव्हरचे उत्पादन सुरू करणे, विशाखापट्टणम, भिलाई येथुन प्राणवायूचा पुरवठा, ऑक्सिजन प्रकल्पांची निर्मिती, रेल्वे, वायुसेनेच्या मदतीनं ऑक्सिजन टँकरचा पुरवठा, कोविड रुग्णालयांची उभारणी यासाठी लागणाऱ्या परवानगी, जागा, निधी असे सारेच नितीनजींनी उपलब्ध करून दिले, अगदी चुटकीसरशी.

राजकारणनिरूपण करताना समर्थ श्रीरामदास स्वामींनी दासबोधात सांगितले आहे की,

दुख: दुसऱ्याचे जाणावें | ऐकोन तरी वांटुन घ्यावें |
बरें वाईट सोसावें | समुदायाचें ॥ १४ ॥
परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥ १९ ॥

दुसऱ्याचे दु:ख नेहमी जाणावे. दु:खीतांचे दु:ख सहानुभूतीने ऐकून वाटून घ्यावे. कुणी काहीही टीका केली तरी ती सहन करावी. आपला चांगलेपणा सोडू नये. दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नये. समर्थांच्या या मार्गदर्शक सूत्रांवर आपले उभे आयुष्य वेचणारे नितीनजी म्हणजे आर्य चाणाक्यने वर्णन केलेल्या व्यक्तीरेखेप्रमाणे आहेत, ज्यात चाणाक्य म्हणतात, ‘माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो’, ‘कार्याच्या आरंभीच अपयशाची भीती न बाळगणारा यशस्वी होतो, अशक्यही शक्य करून दाखवितो’, ‘आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा जो धैर्याने सामना करतो तो खरा विजयी’ आणि ‘जो निश्चित ध्येय डोळ्यापुढे ठेवत वाटचाल करतो, तोच यशशिखरावर पोहोचतो’. चाणाक्याच्या त्रिसूत्रींचा नितीनजींनी जीवनात अंगीकार केला. आपल्या विकास कामांच्या जोरावर त्यांचे नावलौकिक झाले, कोणतेही काम हाती घेताना त्यांचा आत्मविश्वास, प्रचंड ईच्छाशक्ती, सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हे ते कार्य तडीस नेते आणि राष्ट्रहिताच्या निश्चित ध्येयामुळे ते राजकीय जीवनातच नव्हे तर चौफेर यशशिखरावर पोहोचले आहे. समर्थांच्या आणि आर्य चाणाक्याच्या निरूपणानुसार असलेल्या या आधुनिक विकास पुरूषाला जन्मदिनी आनंददायी, सुखी-समृद्ध, शांतीमय व आरोग्यदायी जीवनासाठी सहस्त्रकोटी शुभेच्छा!