भाग :196:
गोंदवल्यास पुनरागमन
चार आठ दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यांत कुरवलीचे दामोदरबुवा गोंदवल्यास आले. बुवांनी कुरवलीला मोठे राममंदिर बांधलें होतें. श्रीमहाराजांनी एकदां येऊन मंदिर पहावें ही त्यांची व कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती म्हणून बुवा आमंत्रण करण्यास आले होते. ‘अनायासै श्रीशंकराचे देखील दर्शन घडेल, चला आपण जाऊन येऊ.’ असे म्हणून श्रीमहाराज कुरवलीला गेले. तेथील लोकांनीं गांवच्या वेशीपासून मंदिरापर्यंत सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. श्रीमहाराजांची मिरवणूक निघाली. त्यात भजन चालू असून गुलाल व बुक्का उधळला जात होता. ठिकठिकाणीं सुवासिनी श्रीमहाराजांना आरती ओवाळीत होत्या. त्यांच्यावरून किती नारळ ओवाळून टाकले असतील याची तर गणतीच नाहीं. श्रीमहाराज कुरवलीला चार दिवस राहिले. पुष्कळ भजन व पुष्कळ अन्नदान झालें. त्यांनीं बुवांना शाबासकी दिली, आणि अशीच उपासना चालवून नामाचा प्रसार करावा ही त्यांना आज्ञा केली. परत निघण्याच्या वेळीं गोंदवल्याहून बरोबर आलेल्या बहुतेक मंडळींना श्रीमहाराजांनी आग्रह करून आपापल्या घरी पाठवून दिले, फक्त चारपांच माणसे बरोबर घेऊन ते गोंदवल्यास परत आले. आल्यानंतर एकदोन दिवसांनीं तेथे असलेल्या मंडळींची पाठवणी हळूहळू सुरू झाली. काशीयात्रेहून परत आल्यानंतर गेल्या चारपांच वर्षात गोंदवल्यास राहणाऱ्या मंडळींची संख्या खूप वाढली होती. श्रीमहाराजांच्या बरोबर चारपांचशें माणसें नेहर्मी असायची. इतक्या लोकांना एकदम परत लावून देणें हें कांहीं सोपे नव्हते, म्हणून पंढरपूरला असल्यावेळेपासूनच त्यांनी मंडळींना घरी पाठविण्यास आरंभ केला होता. महिना दीड महिन्यांत त्यांनीं कोणाच्याहि विशेष लक्षांत येणार नाहीं अशा खुबीनें बहुतेक सर्व लोकांना गोंदवल्याहून बाहेर काढले, कायम राहणारी आणि अगर्दी निकट सहवासांत असणारी तेवढीच मंडळी तेथे उरलीं.
————————————–
प्रा . श्रीपाद केशव बेलसरे, मालाड, मुंबई
——————————————–
॥ जानकीजीवनस्मरण जय जय राम ॥
महारुद्र जे मारुती रामदास । कालिमाजी ते जाहले रामदास
जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती । नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमूर्ति