आज नृसिंह जयंती आजच्याच दिवशी प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला.
नरसिंह जयंती कथा अशी आहे
हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. ‘देवांपेक्षा मीच मोठा’, असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. ‘नारायण नारायण’ असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी. त्याप्रमाणे प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकण्यात आले, उकळत्या तेलात टाकण्यात आले, आगीमध्ये पेटवण्यात आले. पण सर्व परिस्थितीत प्रल्हाद “नारायण नारायण” असा जप करतच राहिला आणि प्रत्येक संकटातून भगवान (विष्णू ) नारायणाने प्रल्हादाला वाचवले. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ”बोल, कुठे आहे तुझा देव ?” प्रल्हादाने सांगितले, ”सगळीकडे.” राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ”दाखव तुझा देव या खांबात.” तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला;
कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धाऊन येईल हा विश्वास ठेवा.
नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य
हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.”
या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.