साहेब, शतायुषी व्हा!

संपादकीय

परिस्थिती अनुकूल असली की सगळेच सोबत असतात, मदत करतात, सुखात- आनंदात उत्साहाने सहभागी होतात ; परंतु विपरीत परिस्थितीत किंवा प्रतिकूल स्थितीमध्ये टाहो फोडून तुम्ही कितीही साद घातली तरीही फारसा प्रतिसाद मिळत नाही आणि जवळचे ही साथ सोडतात. असा सार्वत्रिक अनुभव आहे, किंवा तो मानवी स्वभाव आहे. परंतु सेवा, सहयोग आणि सहृदयता ही त्रिसूत्री अंगिकारलेल्या एका संवेदनशील राजकीय नेत्याला मात्र वरील स्वभावगुण लागू पडत नाहीत किंबहुना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन गरजू होतकरू आणि तळागाळातील माणसांना मदत करणे ही या जगावेगळ्या माणसाची वैशिष्ट्ये आहेत. नितीन गडकरी हे या संवेदनशील माणसाचं नाव.

नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या विकासाच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ सुरू करण्यात आलेल्या मानस उद्योग समूहात तसेच सियान ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीसोबत काम करताना मी हे अतिशय जवळून अनुभवले. औद्योगिक प्रगती साधत असतानाच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध सेवा कार्यात भरीव योगदान साहेबांनी दिले आहे आणि त्यात सातत्यही आहेच.

शेती आणि शेतकरी संपन्न झाल्याशिवाय ग्रामीण भारत सुखी होणार नाही आणि खरा भारत ग्रामीण भागातच वसलेला असल्याने दीन, दलित शोषित पीडितांना सर्वार्थाने आधार देण्यासाठी नितीनजिंनी पूर्तीच्या माध्यमातून सुरू केलेली लोकसेवेची चळवळ आता घट्ट झाली आहे. अर्थातच नितीनजिंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांची ही चळवळ घट्ट करण्यासाठी श्री निखिल गडकरी आणि श्री सारंग गडकरी सतत सक्रिय असतात. दोन्ही उद्योग समूह अत्यंत जबाबदारीने आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे हे संवेदनशील भावंड व सोबतचे संचालक मंडळ समुहाच्या उद्दिष्टांकडे तसूभरही दुर्लक्ष करीत नाहीत.
स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी चालणारी 734 एकलव्य एकल विद्यालये असोत, पंडित दीनदयाल उपाध्याय मेडिकल रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून गरिबांची आरोग्य सेवा असो की, पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून पाण्याच्या सिंचनासाठी पुढाकार असो नितीनजी सहकार्यासाठी सतत तत्पर असतात. या सेवाकार्यात कुठेही खंड नाही; असे असतानाच दीड वर्षांपूर्वी अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे जगाप्रमाणे भारतातीलही सर्वच क्षेत्रावर संकट कोसळले. कोरोनामुळे भारतातील असंघटित कामगार दलित वस्त्यांमधील गरीब कुटुंब आणि मोलमजुरी करणाऱ्या प्रत्येकावर लॉकडाऊन मुळे उपासमारीचे संकट कोसळले होते. गेल्या वर्षी एप्रिल, मे, जून या काळात परिस्थिती विदारक होती. अर्थचक्र थांबले होते ; पर्यायाने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असतानाच नागपूर आणि परिसरातील अशा कुटुंबीयांना मदत करण्यासाठी नितीन गडकरी यांच्यातील संवेदनशील माणसाने पुढाकार घेतला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नितीनजींनी त्यावेळी सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि सेवा वस्त्यांमध्ये निदान जीवनावश्यक वस्तू तरी आपण पोहोचवू शकतो काय याची चाचपणी केली. अनेकांना पुढे येण्याचे आवाहन केले परंतु केवळ बैठक घेऊन सूचना देऊन निश्चिंत होणार्यांपैकी नितीन गडकरी निश्चितच नाहीत. त्यामुळे मदतीसाठी आधी स्वतः पुढे यायचे.
“आधी केले मग सांगितले” या उक्तीचे आचरण करणार्‍या नितीनजींनी लॉकडाऊन च्या काळात सुरू केलेली सेवेची परंपरा आजतागायत सुरूच आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेतही तो पायंडा कायम ठेवला. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्या दररोज बातम्या कानावर धडकत होत्या. परिस्थिती गंभीर होत असतानाच पुन्हा एकदा नितीनजी “संकटमोचक” म्हणून नागपूर आणि विदर्भासाठी धावून आले. विविध संस्था व्यक्ती यांना पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले; परंतु हे आवाहन करत असताना सुरुवातीलाच मानस उद्योग समूहाकडून पन्नास लाख रुपयांची मदत ऑक्सीजन पुरविण्यासाठी केली जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

” साहेब आहेत म्हणून नागपूरची स्थिती रुळावर आली “असं नागपुरातील आणि विदर्भातील प्रत्येकच माणूस बोलू लागला हे उगाच नाही.
उगीच कुणी तरी एखादा प्यारे खान ” गडकरी मेरे भगवान है” असं म्हणत नाही, किंवा त्यांच्या हाकेला ओ देत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी स्वतःला झोकून देत नाही. सेवा सहयोग आणि सहृदयता ही त्रिसूत्री जी नितीन गडकरी यांनी अंगीकारली कार्यकर्त्यांमध्ये रुजविली घराघरात, मनामनात बिंबविली त्यामुळेच आज सज्जनशक्ती नितीन गडकरी यांच्या हाकेला प्रतिसाद देत तातडीने धावून जाते, आणि ‘he deserves it’. अश्या या सेवाव्रती किमयागारास वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शब्दही थिटे पडतात.
नितींनजी तुम्ही प्रेरणा आहात, ऊर्जा आहात, दैवत आहात प्रत्येक मराठी माणसाचे आणि संवेदनशील समाजाचे. यापुढेही तुमच्याकडून समाज आणि देशहिताचे भरीव कार्य असेच पार पडो आपणाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा!

नितीन कुळकर्णी