आव्हाडांच्या कपोलकल्पित प्रश्नावर ना. मुनगंटीवार यांचे सडेतोड निवेदन
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसारच
खबरदार, चुकीचा “नेरेटिव्ह” सेट कराल तर…
मुंबई, दि 30: चुकीच्या पद्धतीने “नेरेटिव्ह” सेट करायचा आणि जनतेला संभ्रमित करायचे, ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची चाल आता महाराष्ट्रातली जनता ओळखायला लागली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व थोर पुरुषांच्या जन्म जयंती व पुण्यतिथी बाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अशाच प्रकारे स्वतःच्याच मनातली माहिती माध्यमांना सांगून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला, त्याला सांस्कृतिक कार्यमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत निवेदन करून सडेतोड उत्तर दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाकडून रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
याविषयावर विधानसभेत निवेदन करतांना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरच्या शिलालेखावर “ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी” अशी श्रीशिवराज्याभिषेकाची स्पष्ट नोंद आहे. त्यात तारखेचा उल्लेख नाही. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच सुरू झाला. त्यामुळे तज्ञ इतिहासकार, इतिहास अभ्यासक व शिवप्रेमी यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनुसार श्रीशिवराज्याभिषेक सोहोळा हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसारच होणे सयुक्तिक आहे, असे ठाम प्रतिपादन ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. सदर बाब ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यापुरतीच मर्यादित आहे, असेही ते म्हणाले. यासंदर्भात अधिक माहिती देतांना ते म्हणाले की १९६२ मधे स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या “रायगडची जीवनकथा” या पुस्तकात रायगडावरील शिलालेखाची आणि श्रीशिवराज्याभिषेक तिथीची सविस्तर माहिती दिलेली आहे.
याबाबत विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत सरकारने शिवजयंती, जिजामाता जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती व पुण्यतिथी हे शासकीय कार्यक्रम तिथीनुसार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितल्याचे श्री जितेंद्र आव्हाड यांनी सदनात सांगितले होते. त्यावर या निवेदनाच्यावेळी उत्तर देतांना ना.श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की अशी कोणतीही मुलाखत मी दिलेली नाही तसेच अशी कोणतीही घोषणाही करण्यात आलेली नाही. आजवर रायगडावर श्रीशिवराज्याभिषेक सोहोळा शासनातर्फ साजरा करण्यात येत नव्हता. आता रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक सोहोळा हा शासकीय पातळीवर करण्याचा निर्णय करण्यात आला असून रायगडावरील शिलालेखानुसार तो तिथीनुसार करावा, इतकाच निर्णय घेण्यात आला आहे, त्याचा शिवजयंती, जिजामाता जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती व पुण्यतिथी या आधीपासून सुरू असलेल्या शासकीय कार्यक्रमांशी काहीही संबंध नाही, असे ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.