विधासभा निवडणुकीत महायुतीच बहुमत मिळवणार
भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांचा विश्वास
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरली असून महायुतीतील सहकारी पक्षांसोबत भाजपा लढणार आहे. सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ.शेलार बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.आपल्या सर्व सहकारी मित्रपक्षांना साथीला घेऊन राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील योजनांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी 10 जुलैपर्यंत अभियान राबविले जाणार आहे, असेही आ.शेलार यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या कोअर कमिटी बैठकीला भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सहसहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
आ. शेलार यांनी सांगितले की, या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा झाली. या निवडणुका भाजपा मित्रपक्षांच्या साथीनेच लढविणार असून महायुतीच्या विजयाचा रोडमॅप तयार झाला आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून मांडला असून सर्व घटकांचे हित साधण्याचा उत्तम प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आल्याचे आ.शेलार म्हणाले. शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवा वर्ग अशा समाजातील सर्व घटकांच्या हितार्थ सर्वसमावेशक विकासासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारच्या आभिनंदनाचा ठरावही या बैठकीत झाल्याचे त्यांनी नमूद केले. 10 जुलै पर्यंत 288 विधानसभा मतदारसंघांमधील 700 हून अधिक मंडलांमध्ये सहकारी पक्षांसोबत प्रत्यक्ष जाऊन अर्थसंकल्पाच्या तरतुदींची विस्तृत माहिती जनतेला देण्यात येणार आहे तसेच अर्थसंकल्पाबाबत जनतेचा अभिप्राय घेण्यात येणार आहे असे ही आ.शेलार म्हणाले.