महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी श्रीमती सुजाता सौनिक

राजकीय

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे सूत्र!

मुंबई 30: वरिष्ठ आयएएस श्रीमती सुजाता सौनिक यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी मावळते मुख्य सचिव श्री नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच एक महिला अधिकारी मुख्य सचिव पदी विराजमान झाली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच “मुख्यमंत्री: माझी लाडकी बहिण” ही योजना सुरू केली आणि त्यातच एक महिला अधिकारी मुख्य सचिव होते हा महाराष्ट्राच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक सोनेरी क्षण आहे.
हरयाणासारख्या लढावय्या प्रांतातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली भारतीय प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीची प्रशासकीय प्रमुख झाल्याने आता राज्यात रयतेसाठी कल्याणकारी योजना अधिक गतीने पुढे नेण्यात येतील असा विश्वास राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे अभिनंदन करताना व्यक्त केला आहे.

गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, कौशल्य विकास, गृहमंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिव तसेच वित्त विभागात प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून त्यांनी सांभाळलेली यशस्वी जबाबदारी व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव महाराष्ट्राला विकासाच्या उंच शिखरावर पोहचविण्यात यशस्वी ठरेल असा विश्वासदेखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.