अमरावतीकर शास्त्रीय गायनात भिजून चिंब
– डॉ. मीरा नवसाळकर – पहुरकर यांचे बहारदार व समृद्ध गायन संपन्न
–
अमरावती :-
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, हिंदुस्थान आर्ट अँड म्युझिक सोसायटी कलकत्ता, आणि सोहनी कॉर्पोरेशन हैदराबाद तर्फे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम खास अमरावतीकर रसिकांसाठी नुकताच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांतर्गत सुविख्यात गायिका डॉ. मिरा नवसाळकर-पहुरकर यांचे गायन आयोजित करण्यात आले होते. डॉ. मीरा ह्या जयपूर आणि आग्रा घराण्याच्या मान्यता प्राप्त गायिका असून त्यांना अनेक सभा संम्मेलनांच्या कार्यक्रमातून रसिकाश्रय प्राप्त झाला आहे, तर पाच पिढ्यांचा सांगीतिक वारसा, स्व.प्रा. पं. कुमुदताई हिरुरकर, जेष्ठ संगीत अभ्यासक तथा श्रेष्ठ कला आचार्य व पद्मविभूषण गुरुवर्य पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्य पं. किशोरजी नवसाळकर, आग्रा घराण्याचे गान महर्षी कै. पं. बबनराव हळदणकर यांच्यासारख्या मातब्बर गुरुपरंपरेने प्रत्यक्ष मार्गदर्शनाचे पाथेय त्यांना प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी राग ‘जैताश्री’ मधील ‘जब ते पियू’ ह्या ताल रूपकातील ख्यालाने प्रारंभ केला. त्याला जोडून दृत त्रितालात ‘मानन किजे’ ही बंदिश प्रस्तुत करून त्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणा द्वारे घरंदाज समृद्ध गायन परंपरेचे दर्शन घडविले.
मिश्र समाज मधील ‘रमैय्या बिन यो’ हया रचनेने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांच्या तबल्यावर डॉ. राम नवसाळकर तर हार्मोनियम वर श्री. ऋषिकेश, तानपुऱ्यावर प्राची पिंपळकर यांनी अत्यंत संयमित व दर्जेदार संगत केली.
परंपरेने गायन शैली प्राप्त झाली असली तरी गायनाला शुष्क उपचारांचा बंदिस्तपणा येऊ नये म्हणून, स्वतःच्या चिंतनाचे स्वत्व मिसळून डॉ. मीरा यांनी आपल्या प्रतिभेने नवीन कल्पना, नवीन प्रयोगाच्या उपयोगाने आपले प्रवाही सूर अशा पद्धतीने योजिले कि, त्यातून व्यक्त होणारा राग आणि सांगितिक आकृती अलौकिक ठरावी. कलावंत, रसिक श्रोते त्याचबरोबर संगीताची गोडी असणाऱ्या सर्व श्रोत्यांना देखील शास्त्रीय गायन सुसह्य व्हावे हा त्यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद होता. सौंदर्याचे पहिले स्वरूप लय तर दुसरे स्वरूप स्वर, ह्या संकेतानुसार त्यांनी आपल्या गायनातील प्रवाहीपणा कायम ठेवला. आयोजकांनी नेमून दिलेल्या वेळातच काटेकोरपणे आपले गायन प्रस्तुत करण्याचा त्यांचा प्रयत्न रसिकांनाही सुखावून गेला. सदर कार्यक्रमातील स्वरांचा तथा लयीचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव हीच त्या सायंकालीन मैफिलीच्या आनंदाची शिदोरी श्रोतू वर्गाने अनुभवली.
साधारणतः कलावंत व संगीत अभ्यासक वर्ग सोडला तर माझ्यासारख्या श्रोत्यांना शास्त्रीय भागातील व्याकरण माहित नसतं. त्यामुळे खोलवर विचारांपासून ते वंचित असतात. परंतु जेव्हा डॉ. मीरा यांच्यासारख्या कलावंताच्या गाण्याचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त होते, तेव्हा परंपरेचे गायन असून सुद्धा, संगीत कलेचे हे भव्य शिल्प अनुभवण्याचा आनंद घेता येतो, आणि व्याकरणाचाही विसर पडतो. शेवटी आनंद हिच तर संगीताची अंतिम फलश्रुती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.