पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा : सुधीर मुनगंटीवार

Uncategorized

पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर, दि.१३ – राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मुदत ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवावी, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिक विम्याच्या संदर्भात आदेश दिले होते. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४’ साठी तातडीने शेतकऱ्यांचा विमा करा, असे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून त्यापूर्वी कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पण ही मुदत आता ३० जुलैपर्यंत वाढविण्याची मागणी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

‘राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकातील उत्पन्नात होणारी घट रोखण्यासाठी शासन पीक विमा योजना गेल्या कित्येक वर्षापासून राबवित आहे. यावर्षी देखील शेतकरी पिक विमा योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. पण पीक विमा नोंदणीची मुदत १५ जुलैपर्यंत दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या हेतूने ३० जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढवावी,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.