२६ / ११ : राज्यपालांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

राजकीय

दिनांक २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.

पोलीस दलातर्फे आयोजित १६ व्या हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे जाऊन हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहिले.

भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ तसेच ‘बिगुलर्स लास्ट पोस्ट’ वाजविले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच गणवेशधारी पोलीस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले.

त्यानंतर राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वरिष्ठ अधिकारी डॉ. इकबाल सिंह चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.