देवेंद्र 3.0 ची सुरूवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ,शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री

राजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सांयकाळी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला. अशा प्रकारे राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे.
या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय नेतेमंडळी साधु-संत-महंत, उद्योगपती, बॉलीवुडमधील मंडळी आणि 40 हजार नागरिक उपस्थित होते
राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने शपथविधी सोहळयाला सुरूवार-
महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधी सोहळयाला राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने सुरूवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीतासाठी आणि राज्यगीतासाठी संपुर्ण मैदानावर लोक उभे राहिले होते.
एकनाथ शिंदेनी पहिल्यांदाच घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ-
महत्वाचे म्हणजे या शपथविधी सोहळयाच्या निमित्ताने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तत्पुर्वी, ते फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार की नाही ? यासंदर्भात राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र अखेर, शिवसेना आमदारांची मागणी मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापुर्वी ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
अजित दादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री-
अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत ते तीन राज्य सरकारांमध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले.