वाशिम – सायकल स्पर्धेच्या माध्यमातून वाशिमचे नाव राष्ट्रीय पातळीवर नोंदविणारे येथील सायकलपटु नारायण व्यास यांनी जगातील दुसर्या सर्वात मोठ्या लांब पल्ल्याच्या सायकल स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. ‘रेस अक्रॉस इंडिया’ ही ४,१०० किलोमीटर लांबीची अत्यंत कठीण सायकल शर्यत असून, ती ३ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीनगर (जम्मू-कश्मीर) येथून सुरू होऊन कन्याकुमारी (तामिळनाडू) येथे समाप्त होणार आहे.
नारायण व्यास हे गेल्या १० वर्षांपासून सायकलिंग क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी आतापर्यंत ५० हजार किमीहून अधिक अंतर सायकलने पार केले आहे. त्यांच्या काही प्रमुख सायकल मोहिमांमध्ये वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) २ हजार किमी., वाशिम ते कारगिल २५०० किमी. वाशिम ते रामसेतू (तमिळनाडू) २ हजार किमी, दिल्ली ते मुंबई दीड हजार किमी. या मोहीमांचा सहभाग आहे. यासोबत व्यास यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पर्यावरण संरक्षण जनजागृती सायकल मोहिमांचे नेतृत्व केले आहे.
नारायण व्यास यांनी केवळ सायकलिंग क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक जागृतीसाठीही विशेष कार्य केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र सायकल वीर पुरस्कार, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिक निर्मूलन अभियानात सहभागाबद्दल पर्यावरण दूत पुरस्कार, युवा पिढीला सायकलिंगकडे प्रवृत्त केल्याबद्दल सायकलिंग प्रेरणा पुरस्कार, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त प्रदीर्घ सायकल प्रवास केल्याबद्दल स्वातंत्र्य अमृत महोत्सव सायकलिस्ट आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
१२ राज्ये आणि देशातील सर्वात लांब महामार्गावरून प्रवास
‘रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेतील सायकलपटूंना भारतातील १२ राज्यांमधून प्रवास करावा लागणार आहे. या प्रवासामध्ये श्रीनगर, उधमपूर, पठाणकोट, लुधियाना, अंबाला, दिल्ली, आग्रा, झाशी, नरसिंहपूर, नागपूर, हैदराबाद, अनंतपूर, बेंगळुरू, कोडाईकनाल, कोची आणि कन्याकुमारी या प्रमुख शहरांचा समावेश आहे. ही शर्यत एनएच ४४, जो भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे, त्यावरून होणार आहे.
विदेशी सायकलपटूंसह भारतीय खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेसाठी भारतासह अनेक विदेशी सायकलपटू देखील सहभागी होणार आहेत. नारायण व्यास यांची ही पहिलीच आंतरराज्यीय सायकल स्पर्धा असली तरी त्यांनी यापूर्वी अनेक मोठे सायकल प्रवास पूर्ण केले आहेत.
दररोज ३२८ किमी सायकलिंगचे आव्हान
या स्पर्धेचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दररोज किमान ३२८ किलोमीटर सायकल चालवणे बंधनकारक आहे आणि ही शर्यत अवघ्या १२.५ दिवसांत पूर्ण करायची आहे. यासाठी खेळाडूंना कमालीचा सराव आणि फिटनेस लागतो.
कठीण तयारी आणि सराव प्रक्रिया
नारायण व्यास यांना या स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी १० ते १२ महिने सराव करावा लागत आहे. सध्या ते आठवड्यातून २ दिवस १०० ते १२० किमी सायकलिंग करतात, तर ५ दिवस जिममध्ये फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत. वाशिम येथील दक्षता फिटनेस क्लब, पोलीस क्वार्टर्स येथे ते सराव करत आहेत. त्यांना वाशिम पोलिसांचे मार्गदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रदीप पाटील यांच्याकडून प्रशिक्षण मिळत आहे.
‘रेस अक्रॉस इंडिया’ अमेरिकेतील स्पर्धेची पात्रता परीक्षा
ही स्पर्धा नागपूरस्थित ‘टायगर मन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेद्वारे आयोजित केली जाते. या संस्थेचे संस्थापक डॉ. अमित समर्थ आहेत. अमेरिकेत दरवर्षी आयोजित केली जाणारी ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही जगातील सर्वात मोठी ६ हजार किमी लांबीची सायकल स्पर्धा आहे. ‘रेस अक्रॉस इंडिया’ ही पूर्ण केल्यानंतर सायकलपटूंना ‘रेस अक्रॉस अमेरिका’ साठी पात्र होण्याची संधी मिळते.
नारायण व्यास यांचे ध्येय
नारायण व्यास यांचे ध्येय ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून वाशिमचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवणे आहे. त्यांना या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत असून, त्यांचे यश वाशिमसाठी अभिमानाची बाब ठरेल.